पंढरपूरच्या वारीचे जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकन
तेराव्या शतकापूर्वी वारीची परंपरा सुरू झाली. देहू व आळंदी पासून 250 किलोमीटरचा प्रवास करून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. वारीला 1000 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे.तुकाराम महाराजांचे वंशज नारायण महाराज यांनी 1685 रोजी पालखी सोहळा सुरू केला. हैबत बाबा महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 1832 मध्ये सुरू केला. तेव्हापासून वारी अविरतपणे चालू आहे.
यावर संशोधन करण्यासाठी राज्य शासनाने मुंबई येथील "मे. आभा नारायण लांबा असोसिएटस" या आस्थापनाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या आस्थापनाने याविषयी संशोधन व व्हिडिओ चित्रीकरण पुरातत्व विभागाच्या संचालकाकडे सादर केलेले आहे. पुरातत्व विभाग याविषयी प्रस्ताव सादर करेल. हा प्रस्ताव सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे. वारीची परंपरा जागतिक पातळीवर पोहोचावी म्हणून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेतलेला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून वारीचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे. वारी विषयी सर्व साहित्य एकत्रित करून दोन तीन महिन्यांमध्ये युनोस्कोला याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या या निर्णयाचे विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष मा. श्री गहिनीनाथ औसेकर व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख मा. श्री विकास ढगे पाटील यांनी स्वागत केले.
जागतिक वारसा समिती
युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणी समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. या समितीची बैठक वर्षातून एक वेळेस होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्रच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने किंवा सभेने सहा वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेले 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. आपल्या प्रदेशातील स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन किंवा नामनिर्देशन करण्याची जबाबदारी राज्य पक्षांची असते.
जागतिक वारसा स्थळ कसे ठरवले जाते?
जागतिक वारसा स्थळ ठरवण्याच्या पाच टप्पे आहेत.
- एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे. यालाच प्रायोगिक किंवा तात्पुरती यादी म्हणतात. ही यादी अतिशय महत्वाची असते. कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही.
- त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईल मध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो.
- जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघाच्या दोन सल्लागार समिती नामांकन फाईलचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात.
- जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात.
- नामांकन झालेले स्थळ हे दहा निवड निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. एखाद्या स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर तिच्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही महत्वपूर्ण भाग म्हणून त्याची गणना केली जाते.
0 टिप्पण्या