A blazing torch of revolution क्रांतीची धगधगती मशाल क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले

क्रांतीची धगधगती मशाल क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले

विद्ये विना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नीतीविना गती गेली,

गतीवीना वित्त गेले,

वित्तविनाशुद्र खचले,

इतके अनर्थ एका व्यक्तीने केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी विद्येचे महत्त्व ओळखलेले होते. शिक्षण जर नाही मिळाले तर शूद्र खचतात हे त्यांनी जाणलेले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षणाविषयी उद्दिष्ट हे समाजामध्ये समानता निर्माण करणारे होते. शुद्रांना शिक्षण दिले तर मानवी हक्काची जाणीव होईल. ते आपले हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. असे महात्मा फुले यांचे मत होते. त्यांना समाजात बंडखोरी निर्माण करायची नव्हती तर मानवात मानवता निर्माण करायची होती. हे फक्त शिक्षणानेच होईल असे त्यांचे मत होते. कुटुंब ही मुलांची पहिली शाळा असते म्हणून त्यांनी या महान कार्याचे सुरुवात स्त्री शिक्षणापासून केली. इंग्रजांना वाटायचे की समाजातील वरिष्ठ वर्गाला शिक्षण दिले म्हणजे ते शिक्षण कनिष्ठ वर्गापर्यंत जाईल. पण त्याचा हा विचार खोटा ठरला. समाजातील तळागाळातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे  करावे असा प्रस्ताव मांडला. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून बोर्डिंग स्कूल निर्माण कराव्यात असा विचार त्यांनी मांडला होता.

महात्मा फुले यांनी आपल्या विचारांचा प्रसार व्हावा याकरिता सांगली, सातारा, मुंबई, पुणे, कोल्हापूर इत्यादी मोठ्या शहरातील आपल्या समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्यासमोर एखादी मध्यवर्ती संघटना स्थापण्याचा विचार व्यक्त केला. आपल्या सहकाऱ्यांचा विचार घेऊन त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 

सत्यशोधक समाज संघटनेचे ध्येय 

शूद्र अतिशूद्र समाजाचे गुलामगिरीतून मुक्तता करणे. त्यांना मानवी हक्काची जाणीव करून देणे.  पुरोहिताकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून त्यांना मुक्त करणे. हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते .

सत्यशोधक समाजाची प्रमुख तीन तत्त्वे 

1)ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निराकार व सत्य रुपी आहे. सर्व मानव प्राणी ही त्यांची प्रिय लेकरे आहेत.

2) ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार असून त्यासाठी दलालाची वा मध्यस्थीची आवश्यकता नाही. 

3) कोणीही जातीने श्रेष्ठ कनिष्ठ नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो.

सत्यशोधक समाजा संघटनेमध्ये महार, मांग, चांभार, ब्राह्मण, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू अशा सर्व जाती-धर्माच्या व्यक्तींना सभासद होण्याची मुभा होती.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्य विचार

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळामध्ये समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्यता म्हणली जात होती. समाजामध्ये जातीमध्ये भेदाभेद केला जात होता. जुने आचार विचार, रुढी परंपरा, कर्मकांड यांचे स्तोम माजलेले होते. वर्चस्ववादी वर्गाच्या वर्चस्वाखाली निपचीत पडलेल्या कनिष्ठ जाती जमातींच्या आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी ज्योतिरावांनी आपल्या साहित्य ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली. कोणताही मनुष्य जातीने, जन्माने किंवा धनने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसून तो आपल्या कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो. प्रत्येक मनुष्य हा स्वतःच स्वतःचा भाग्य निर्माता आहे. कोणताही धर्म, ग्रंथ हा ईश्वरनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहे. चातुर्वन्य, जातिभेद ह्या पद्धती देवनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत इत्यादी बाबी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

महात्मा ज्योतिबा फुले यांची साहित्य संपदा

  • स्फुट 
  • तृतीय रत्न नाटक 1855
  • ब्राह्मणांचे कसब 1869 
  • पोवाडा छत्रपती शिवाजी राजे यांचा 1869
  • गुलामगिरी 1873 
  • शेतकऱ्यांचा असुड 1883
  • इशारा 1885
  • सत्सार 1885 
  • सार्वजनिक सत्यधर्म 1891
जातिभेदामुळे आपला देशाभिमान संकुचित झाला जातीमुळे ज्ञान कला शास्त्रे इत्यादी जिथल्या तिथे कोंडल्यासारखी झाली आलेली आहेत जातीमुळे धर्मविचार व आचरात मतभेद निर्माण होऊन परस्पर वैर निर्माण झाली आहे जातीमुळे आपले बंधुप्रेम उदारता परोपकार वरती वृत्ती भूतदया मर्यादित झाली आहे म्हणून जातीभेद दूर करा सामाजिक समता प्रस्थापित करायचे असेल तर व्यक्ती स्वतंत्र्याचा परिघोष झाला पाहिजे अस्पृश्यता निवारण आणि सर्व जाती बदाने दूर करायचे असतील तर समाजात शिक्षणाचा प्रसार पराकोटीचा झाला पाहिजे.


स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली
महात्मा फुले म्हणतात की,
जिच्या हाती पाळण्याची दोरी,
ती जगाते उद्धारी.
स्त्रियांना पूर्वी चूल आणि मूल एवढेच काम होते. चार भिंतीच्या आतच तिचे जग होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.
समाजातील शूद्रांना व स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा निर्धार ज्योतिराव फुले यांनी केलेला होता. उपेक्षित समाजाला आपल्या आत्म सन्मानाची जाणीव निर्माण करण्याकरता समाजामध्ये जलद गतीने स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी शिक्षणाचा प्रसार अपेक्षित वर्गामध्ये होणे आवश्यक आहे हे ज्योतिराव फुले यांनी ओळखलेले होते. समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी समाजाच्या रोशामुळे शिक्षक मिळत नसल्याचे लक्ष देताच त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. त्यांना शिक्षित केले व शाळेमध्ये शिक्षिका होण्यास उद्युक्त केले. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत. त्यांनी महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामध्ये मोलाची साथ दिली. 1848 ते 1852 या कालावधीत महात्मा फुले व सवित्रीबाई फुले यांनी एकूण 18 शाळा काढल्या. त्यांचे शिक्षणाचे कार्य अधिक जोमाने सुरू राहिले. 19 व्या शतकातील एक उत्तम मुख्याध्यापिका म्हणून सरकारनेही त्यांचा गौरव केलेला होता.

महात्मा फुले यांचा जीवन परिचय थोडक्यात
  • जन्म 1827 
  • पंतोजीच्या शाळेत प्राथमिक मराठी शिक्षण 1834 ते 1838
  • सावित्रीबाई यांच्याशी विवाह 1840
  • मिशनरी शाळेतील माध्यमिक इंग्रजी शिक्षण 1841 ते 1847 
  • लहुजी साळवे यांच्याकडे मल्ल, तालीम आणि क्रांतिकारक विचार 1847 
  • राइट्स ऑफ मॅन या ग्रंथाचे मनन 1847
  • उच्चवर्णीय लग्नाच्या मिरवणुकीत अपमान 1848 
  • शूद्रादी शुद्रासाठी मुलींची पहिली शाळा 1848 
  • शूद्राना ज्ञानदान करण्यासाठी पत्नीसह ग्रह त्याग 1849 
  • चिपळूणकर वाडा व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळेची स्थापना 1851 
  • मे. कँडी यांच्याकडून शिक्षण कार्याबद्दल सरकारकडून गौरव 1852
  • स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी 1854 
  • तृतीय रत्न नाटकाचे लेखन 1855
  • रात्र शाळेची स्थापना 1855 
  • मारेकर्‍याकडून हत्येचा प्रयत्न 1856
  • विधवा पुनर्विवाहस साह्य 1860
  • बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना 1863 
  • घरचा हौद अस्पृश्यासाठी खुला केला 1868 
  • छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 1869
  • ब्राह्मणांचे कसब ग्रंथ 1869
  • गुलामगिरी ग्रंथ 1873
  • सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 
  • स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक 1875
  • पुणे नगरपालिकेचे सदस्यत्व 1876 ते 1882
  • हंटर आयोगा पुढे निवेदन 1882
  • शेतकऱ्यांचा आसूड 1883 
  • सत्सार क्रमांक एक 1885 
  • सत्सार क्रमांक दोन व इशारा 1885
  • ड्युक ऑफ कॅनॉट चा सत्कार 1888 
  • महात्मा ही पदवी अर्पण 1888
  • सार्वजनिक सत्य धर्म चे लेखन 1889 
  • मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 
  • सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ प्रकाशित 1891
स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले
शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले 
समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले
शेतकऱ्याचे तारणहार महात्मा ज्योतिबा फुले 
मजूर संघटनेचे जनक महात्मा ज्योतिबा फुले 
शिव पोवाड्याचे जनक महात्मा ज्योतिबा फुले 
नेल्सन मंडेलाचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले
शाहू महाराजांची प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले 
अनाथांचा पहिला पिता महात्मा ज्योतिबा फुले 
असा क्रांतीचा धगधगता ज्वाला महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला हे माय भूमीचे भाग्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या