World Mother's Day जागतिक मातृत्व दिन

    


          जिच्या हसण्याने मी स्वतःचे अस्तित्व मानतो,

            देवा माफ कर, तुझ्या आधी आईला मानतो."

             "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी "

खरंच कवी यशवंताची ही ओळ किती यथार्थ आहे. या जगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. परंतु मिळत नाही ते म्हणजे आईची माया व ममता. आईच्या मायेपासून वंचित राहिलेला स्वामी, जरी त्याची तिन्ही जगावर सत्ता असली तरी या खऱ्या प्रेमाला पारखा झाल्यास तो भिकारीच राहणार नाही का? आई हा छोटासा दोन अक्षरी शब्द परंतु तो प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. आकाशात उंच भरारी मारण्याचे बळ पंखात निर्माण करतो. मातेचे प्रेम अतुलनीय आहे म्हणून तर कुणापुढेही वाकलेला जग जिंकणारा सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत होता. वत्सल्यापोटी माता आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या बाळास दूध पाजते. शिवकाळातील हिरकणीचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे.

               आई बद्दल किती सांगू आणि किती सांगितले तरी कमीच आहे. मला आई विषय एक छान कविता अजून आठवते...

                            आई म्हणजे आई असते 

                            ती लेकराची माय असते; 

                            वासराची गाय असते,

                            लंगड्याचा पाय असते; 

                            घरात असते तेव्हा,

                            गजबजलेलं गाव असते;

                     घरात नसते तेव्हा सर्व रान अपुरे पडते. 

आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही. बाकी सर्व काही गोष्टी माणूस पैशाने विकत घेऊ शकतो. पण त्याला मिळत नाही ती एकच गोष्ट म्हणजे आईचे प्रेम! कवी मोरोपंतांनी मातेच्या प्रेमाची महती जाणली होती म्हणूनच ते म्हणतात,

                 प्रसादपट झाकिती परी परागुरूचे थिटे, 

                म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे.

या परमेश्वर रुपी आईचे मला जग दाखवणाऱ्या व माझे प्रेरणास्थान असणाऱ्या आईच्या दुधाचे पांग फेडण्यासाठी एक जन्म निश्चितच पुरणार नाही. म्हणून या धर्तीवर पुन्हा पुन्हा जन्म मिळावा हीच अपेक्षा. आज माझी आई जे काही करत आहे. ते फक्त माझ्यासाठीच. भविष्यात काही करायचे आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईसाठीच म्हणून मला असे लिहावेसे वाटते की... 

                 जन्मोजन्मीच्या या क्षणाला 

                हेच आई भेटू दे मला 

               जीवनातील माझ्या आहे ती अशा 

               करणार नाही मी तिची निराशा 

               जीवनातील या प्रत्येक यशाला 

               तिचाच आशीर्वाद माझ्या माथ्याला 

जर मला कोणी विचारलं की जगातील सर्वात सुंदर स्त्री कोण? तर मी अगदी ठामपणे सांगेल की माझी आईच! 

" My Mother is the most beautiful women in the World "

                     खरंच कितीही प्रयत्न केले तरी, 

                         न ऋण जन्मदेचे फिटे!

 हेच खरं म्हणूनच माझ्या सर्व गुणसंपन्न आईसाठी मी म्हणेन, 

                   "आकाशाचा केला कागद, 

                     समुद्राची केली शाई,

                    तरीही लिहून संपणार नाही, 

                    माझ्या आईची थोरवी."

मदर्स डे ची सुरुवात कशी झाली?

मदर्स डे ची सुरुवात 1908 मध्ये झाली. ज्यावेळी अँन जार्विसने अमेरिकन युद्धातील जखमी सैनिकांची काळजी घेणाऱ्या शांतता प्रिय कार्यकर्त्या ॲन जार्विस या तिच्या आईसाठी एक स्मारक उभारले.  हा कार्यक्रम वेस्ट व्हर्जिनियाच्या ग्राफ्टन येथील सेंट अँड्र्यू मेथोडिस्ट चर्चमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सध्या आंतरराष्ट्रीय मातृदिनाचे मंदिर आहे. अँन जार्विस यांनी त्याच वर्षी आईचे निधन झाल्यानंतर 1905 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये मदर्स डे साजरा करण्यासाठी पाठिंबा मिळवण्याचे काम सुरू केले.  तिला जगातील सर्व मातांचा सन्मान करायचा होता ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी खूप काही केले आहे. तिच्या या अथक प्रयत्नांमुळे, 1911 पर्यंत अमेरिकेतील बहुतेक राज्यांनी स्थानिक सुट्टी म्हणून मातृदिन साजरा करण्यास सुरुवात केली. वेस्ट व्हर्जिनिया, जार्विसचे गृहराज्य हे 1910 मध्ये या प्रसंगी सुट्टी जाहीर करणारे पहिले राज्य बनले. शेवटी,  मे महिन्याचा दुसरा रविवार अधिकृतपणे यूएसए मध्ये मदर्स डे म्हणून घोषित करण्यात आला. वूड्रो विल्सन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे 28 वे राष्ट्राध्यक्ष यांनी 1914 मध्ये या घोषणेवर स्वाक्षरी केल्यानंतर राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात आले. अशाप्रकारे, सध्याचा मातृदिन अस्तित्वात आला.  यूएसएमध्ये सुरू झालेला मदर्स डे भारत, बांगलादेश, पाकिस्तान, इटली, सिंगापूर, बेल्जियम आणि इतर अनेक देशामध्ये साजरा केला जातो.

                       मदर्स डे मातांच्या सन्मानार्थ जगभरातील देशांमध्ये साजरा केला जातो.  मदर्स डे दिवशी सुट्टीची सुरुवात युनायटेड स्टेट्स मध्ये झाली. मदर्स डे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.  इतर अनेक देश देखील या तारखेला सुट्टी साजरी करतात. तर काही वर्षाच्या इतर वेगवेगळ्या वेळी साजरा करतात.  मध्ययुगीन काळात लेटेरे रविवारी, लेंटच्या चौथ्या रविवारी, जे लोक दूर गेले आहेत. त्यांना त्यांच्या घरातील व्यक्तींना आणि त्यांच्या मातांना भेटण्याची प्रथा सुरू झाली.  ब्रिटनमध्ये याला मदरिंग संडे असे म्हणतात. आधुनिक काळात हा डे चालू राहिला. त्याला मदर्स डे असे म्हणू लागले.

आपण मदर्स डे का साजरा करतो?

मदर्स डे हा एक प्रसंग आहे. जो जगातील विविध भागांमध्ये मातांचा आदर, सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.  हा दिवस मातांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, मातृबंधांच्या प्रयत्नांना आणि आपल्या समाजातील मातांच्या भूमिकेची कबुली देण्यासाठी एक कार्यक्रम आहे. कित्येक देश वेगवेगळ्या तारखांना हा उत्सव साजरा करतात. परंतु हा उत्सव मार्च किंवा मे मध्ये साजरा केला जातो. मदर्स डे हा फादर्स डे, सिबलिंग डे, आजी आजोबांचा दिवस आणि इतर उत्सवांप्रमाणेच एक उत्सव दिन आहे. हा एक असा दिवस आहे जो लोकांना त्यांच्या जीवनातील आईचे महत्त्व लक्षात ठेवतो. जगभरातील मातृत्वावर विशेष भर देण्यासाठी हा दिवस मदर्स डे म्हणून पाळला जातो.

                           तुझे माझे नाते घनिष्ठ,

                           आई तू जगात सर्वश्रेष्ठ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या