Nagpanchami नागपंचमी आणि अर्जुनाचा नातू जन्मजेय यांचा सहसंबंध तसेच नाभिक समाज व नागपंचमी यांचा सहसंबंध
नागपंचमी हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी नागपंचमी ९ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच आज आहे. नागपंचमी बद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात त्यापैकी आपण दोन आख्यायिका पाहणार आहोत.
नागपंचमी आणि अर्जुनाचा नातू जन्मजेय यांचा सहसंबंध
जेव्हा अर्जुनाचा नातू व परिक्षीतचा मुलगा जन्मजेय याला समजले की आपल्या वडिलांचा मृत्यू तक्षक सर्प चावल्याने झालेला आहे. तेव्हा त्याने सर्व सर्पाना मारण्यासाठी सर्प सत्र यज्ञ केला. यज्ञ हवन केल्यानंतर एक एक साप हवन कुंडामध्ये येऊन पडू लागले. तक्षक नाग घाबरला इंद्र देवाच्या सिंहासनाच्या पाठीमागे लपला. जेव्हा तक्षक नागासाठी अहुती सुरू झाली तेव्हा आस्तिक ऋषीने यज्ञ थांबवला. तक्षक नागाला यज्ञातील अग्नी ज्वाला पासून वाचवण्यासाठी दूध अर्पण केले. तक्षक व नागवंश या यज्ञापासून वाचला. असे मानले जाते की तेव्हापासून नागपंचमी साजरी करण्यात येऊ लागली.
नाभिक समाज सहसंबंध
केश कर्तन करणारा नाभिक समाज संपूर्ण भारतामध्ये सर्वत्र आहे. हा समाज न्हावी, न्हावकी, सेन, नायिक, हजाम, वारिक, क्षीरक, नापित, कारागीर, सन्मुख, वालंद, कैलासी, घायजो, मटको, म्हाली,मंगल, वावडी, चसकी, खवास, भंडारी अशा अनेक नावांनी ओळखला जात आहे. नाभिक समाज भगवान शिव शंकर, विष्णू आणि ब्रह्मा यांच्यानंतर या सृष्टीमध्ये मनुष्यरुपाने जन्म घेणारी पहिली व्यक्ती म्हणजे नाभिक असे मानले जाते. नागपंचमी हा दिवस नाभिक समाजामध्ये अधिक महत्वाचा मानला जातो. पण आपण कधी विचार केलाय का ? नागपंचमी या सणाचा आणि नाभिक समाजाचा संबंध काय आहे ? नाभिक समाज नागपंचमी का साजरा करतो ?
चला तर याबाबत थोडक्यात माहिती घेऊयात...
'नाभिक पुराण' ग्रंथामध्ये नाभिक समाज आणि नागपंचमी यातील सहसंबंध सापडतो. नाभिक पुराण हा अतिप्राचीन ग्रंथ असून १८ पुराणांतील चौथ्या क्रमांकाचे पुराण मानले जाते. परंतु त्याच्या लेखनकाळाविषयी अधिक माहिती मिळत नाही. त्यामुळे 'विश्वनाथ भारती' यांनी १६३८ मध्ये लिहिलेल्या नाभिक पुराण या ग्रंथाचाच येथे आधार घ्यावा लागतो. हा ग्रंथ चौदा अध्यायाचा असून यामध्ये मराठी ओवी संख्या १५६६, मिश्र मुसलमानी भाषेतील ओव्या ५५ आणि कुराणातील १३ आयते आहेत.
पहिल्या अध्यायामध्ये नाभिकाची उत्पत्ती कशी झाली याविषयी कथा सांगितलेली आहे. ती अशी की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा सृष्टीवर जिकडे तिकडे अंधार आणि सर्वत्र पाणीच पाणी होते. या अंधारात आणि पाण्यात एक अव्यक्त परमात्मा वास करीत होता. तोच आदिपुरुष म्हणजे भगवान शिव शंकर होय. शंकराने आपल्या हृदयापासून मायेच्या पोटी विष्णूला जन्म दिला आणि त्याच्या कानात सहा अक्षरांचा वेदमंत्र सांगितला होता. त्या वेदमंत्राचा ध्वनी विष्णूच्या नाभीशी जाऊन स्थिरावला होता. शंकराच्या आदेशानुसार या नाभितून कमळाच्या आठ पाकळ्यातून चतुरानन ब्रह्माचा जन्म झाला होता. सृष्टीच्या निर्मितीसाठी आपल्या मायासामर्थ्याने आदिपुरुषाने विष्णुच्या साहाय्याने ब्रह्माला म्हणजेच ब्रह्मदेवाला जन्म दिला होता. परंतु ब्रह्मा हा ब्राह्मण असल्याने त्याचे मुंज केल्याशिवाय त्याची शुध्दी होणार नव्हती. म्हणून विष्णूने ब्रह्माची मुंज करण्याची कल्पना भगवान शंकराकडे मांडली. कारण की नंतर ब्रह्माच सर्व वेद सांभाळणार होता. आणि त्यांच्याकडून सृष्टीची निर्मिती होणार होती.
पंरतु शंकर आणि विष्णू या दोघांपुढे मोठा प्रश्न होता की, ब्रह्माची मुंज करणार कोण ? तेव्हा शंकराला आपल्या गळ्यातील शेषनागाची आठवण झाली होती. शंकराने शेषनागाला आपल्या नाभीतून मनुष्य रुपात जन्म घेण्यास सांगितले होते. शिव शंकरापासून दूर व्हावे लागेल, या भावनेने शेषनागाने त्यास अगोदर विरोध केला होता. तेव्हा भगवान शिव शंकर शेषनागाला म्हणाले, श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला तुझी घराघरात पुजा होईल. तुला लोक नवस बोलतील, बाला, प्रौढा, नारी तुझी बंधू म्हणूनच पुजा करतील. तुझ्या सर्व जातिबांधवांना अत्यंत सन्मानाने वागवले जाईल. देव, दानव, यक्ष, किन्नर व चारी वर्ण आणि सर्व जाती जमाती या सर्वांना तुझ्याच हाताने पावित्र्य लाभेल. भगवान शिव शंकर आणि विष्णूच्या या विनंतीनुसार शेषनागाने भगवान शिव शंकराच्या नाभीतून मनुष्यरुपाने जन्म घेतला. नाभीच्या कुंडलिनीतून त्याचा जन्म झाला म्हणून त्याचे गोत्र कौडिण्य झाले आणि शेषाचा अवतार असलेला, शिव शंकराच्या नाभीतून जन्म घेतला म्हणून त्यास नाभिक हे नाम प्राप्त झाले. नाभिकाचा जन्म झाला खरा, पण ब्रह्माची मुंज करण्यासाठी कुरा म्हणजेच हत्यार नको का? तेव्हा शंकराने आपल्या अंतःकरणातील पाचव्या सूक्ष्म वेदाला पाचारण केले व त्यापासून तात्काळ मंत्रमय कुरा तयार केला होता. हे झाले नाभिकाचे हत्यार, त्यानंतर या हत्याराच्या साहाय्याने नाभिकाने ब्रह्माची शेंडी राखली व त्यानंतर ब्रह्मदेवाचे मौजीबंधन संपन्न झाले होते.
अशा रितीने नाभिक पुराण या ग्रंथानुसार शेषनाग हा नाभिक समाजाचा पूर्वज मानला जातो. त्यामुळे नागपंचमी हा सण नाभिक समाजासाठी पवित्र मानला जातो. म्हणून नाभिक समाज नागपंचमी दिवशी आपली दैनंदिन कामे बंद ठेवून नागाची पूजा करतात व आपल्या पूर्वजाचे स्मरण करतात.
0 टिप्पण्या